Posts

उकिरडा ( एक अ-राजकीय प्रहसन )

गावकुसाबाहेरच्या एका उकिरड्यावर आपापल्या जेवणाची वेळ झाल्यावर त्या उकिरड्यावर पोसले गेलेले प्राणी एक एक करत जमायला लागले. दर आठवड्याच्या शुक्रवारी गावच्या घरांबरोबर मंडई, खाटीकखाना, मासेबाजार अशा खास जागी जमलेला खास कचरा जमा करून स्वच्छता अभियानाच्या गाडीतून गावाबाहेर आणला जाई आणि उकिरड्यावर टाकलं जाई. या दिवशी दूरदूरच्या गल्लीबोळातून वेगवेगळ्या जातीचे, आकाराचे आणि वयाचे प्राणी सहकुटुंब त्या उकिरड्यावर जमा होतं असत. त्या प्राण्यांबरोबर त्यांच्या कुळात जन्म घेतलेले काही लाळघोटे नातेवाईक असत, जे आपल्या पोटाच्या सोयीसाठी आपल्या कुटुंबप्रमुखाबरोबर सगळीकडे हिंडत असत. परजातीच्या प्राण्यांशी होणाऱ्या वादविवादात आपल्या प्रमुखाच्या मागे उभं राहून तारस्वरात केकाटणे आणि चुकून एखाद्या योद्ध्याच्या वंशातल्या मनुष्यप्राण्याने दगड अथवा काठी उगारली, तर आधी दूर पळून जाऊन तिथून दातओठ विचकून दाखवणे अशा गोष्टींमध्ये हे नातेवाईक पारंगत असत.  उकिरड्याचा मालकी हक्क तसा त्या गावाचा. त्या जागेवर अनिर्बंध सत्ता गाजवणे प्राणी किंवा पक्षी जगतातल्या कोणाला जमलं कधीच जमलं नसलं, तरी श्वान जातींच्या प्राण्यांची त...